मराठी हिन्दी English

फोन नं. +९१-२५९४-२३३२१५
+९१-२५९४-२३४२५१

कुंभमेळा २०१५-१६

भारतात कुंभपर्व चार ठिकाणी साजरे केले जातात. हरिद्वार, अलाहाबाद, उज्जैन व त्र्यंबकेश्वर, नाशिक. याविषयीची अख्यायिका अशी....देव व दानवांनी समुद्र मंथन केले. त्यावेळी त्यातून १४ रत्ने निघाली. त्यातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा ते मिळविण्यासाठी देव व दानवांमध्ये युध्द सुरू झाले. इंद्राचा मुलगा जयंत अमृत कलश घेऊन पळू लागला. दानवांनी त्यांचा पाठलाग केला. या झटापटीत अमृत कलश पृथ्वीवर चार ठिकाणी ठेवला गेला. ज्या चार ठिकाणी अमृत कलश ठेवण्यात आला तीच ठिकाणे कुंभमेळयाची होत. या प्रसंगी अमृत कलशाचे फुटण्यापासून सूर्याने रक्षण केले. दैत्यांपासून गुरूने रक्षण केले. अमृत सुकू नये म्हणून चंद्राने काळजी घेतली. इंद्रपुत्र जयंताने स्वत:च अमृत पिऊ नये यासाठी पहारेदारी शनीने केली.

सूर्य, चंद्र व बृहस्पती अमृत कलशाच्या रक्षणाचे वेळेस ज्या ज्या राशीमध्ये होते ती ती वेळ पुन्हा आली की त्या त्या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो. याविषयी स्कंदपुराण, ब्रम्हपुराण व पद्मपुराण यांमध्ये माहिती दिली आहे. हरिद्वार, अलाहाबाद, किंवा उज्जैन याठिकाणी फक्त कुंभमेळा म्हटले जाते. परंतु ज्यावेळेस कुंभमेळा त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे भरतो त्यावेळेस गुरु, सूर्य व चंद्र ही तीनही ग्रह सिंह राशीत असतात म्हणून यास सिंहस्थ कुंभमेळा असे म्हणतात. गुरू ने सिंह राशीत प्रवेश केल्यापासून सिंह राशी पार करेपर्यंतचा तेरा महिन्याचा कालावधी सिंहस्थ कुंभमेळा म्हणून ओळखला जातो. व ज्या वेळेस तिन्ही ग्रह सिंह राशीत असतात. त्यावेळेस अशी ग्रहस्थिती श्रावणी अमावास्या अर्थात पोळयाच्या दिवशी असते तो दिवस महापर्वणी म्हणून ओळखला जातो.

सिहस्थ पर्वकाळात गोदावरीत स्नान करणे विशेष पुण्यकारक आहे. सिंहस्थ काळात गोदावरीत एक स्नान केल्याने साठ हजार वर्षे गंगेत स्नान केल्याचे पुण्य लाभते. नर्मदेच्या तीरावर तपाचे, कुरुक्षेत्रावर दानाचे व गंगेकाठी मरणाचे जे पुण्य असते ते सर्व गौतमी गंगेच्या स्नानाने मिळते. गंगा गोदावरीचे अवतरण माघ शुध्द दशमीला सिंहेचा गुरू असतांना झाले आहे. गौतमांना गोहत्येच्या पातकापासून मुक्ती दिल्या नंतर गंगा परत मुळस्थानी म्हणजे शंकराच्या जटेत निघून जात होती परंतु लोकांच्या कल्याणाकरिता तिने पृथ्वीवरच रहावे असे शंकरांनी सांगितले. लोकांचे पाप दूर करून मला मलिनता येईल तेव्हा मी काय करावे असे गोदावरीने विचारताच शंकरांनी सर्व नद्या तीर्थ सरोवरे व ऋषीमुनींना आज्ञा केली की सध्या सिंह राशीस गुरू आहे तोपर्यत तुम्ही सर्वांनी याठिकाणी वास करावा. त्याप्रमाणे सर्वांनी कबूल केले की सिंहेचा गुरू असेपर्यंत आम्ही सर्व येथे राहून रोज गोदावरीत स्नान करून त्र्यंबकराजाचे दर्शन पूजन करू. त्याप्रमाणे ती प्रथा आजही चालू आहे. सर्व साधू महात्मे पर्वणीचे दिवशी कुशावर्तावर स्नान केल्यानंतर श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शनास जात असतात. इतर तीन कुंभमेळयाचे ठिकाणी फक्त स्नाने केली जातात. परंतु येथे स्नानानंतर त्र्यंबकेश्वराचे दर्शनाची परंपरा आहे.

आद्य शंकराचार्यांनी सर्व साधुंचे संगठन केले त्यानंतर एकुणच व्यवस्थेकरिता आखाडयांची स्थापना करण्यात आली. पुढे हिंदू धर्मावर मुसलमानांचे आक्रमण सुरु झाल्यावर त्यास प्रतिबंध करण्याकरिता सन्याशांनी शस्त्र हाती घेतले व ते नागा अवस्थेत विचरण करू लागले. आजही नागा संन्याशी त्र्यंबकेश्वरी पर्वणीच्या काळात शाही स्नानाकरिता कुशावर्तावर दिंगबर आखाडा, निरंजनी आखाडा, आनंद आखाडा, महानिर्वाणी आखाडा, अटल आखाडा इ. सात संन्याशांचे आखाडे तसेच बडा उदासी, व निर्मळ आखाडा याप्रमाणे सांधुचे आखाडे आहेत.

पहाटे प्रथम नागा संन्याशांची शाही येते. त्यानंतर दुसरी शाही नागा संन्याशांचीच असते. नागा संन्याशी सकाळी सूर्योदयापूर्वी शाही स्नाने व दर्शन करुन आपापल्या आखाडयात परततात. सध्या बैरागी कुशावर्त तिर्थावर शाही स्नाना करिता येत नाहीत परंतु पूर्वी येत असत. त्याकरिता सकाळी ८ ते १० ची वेळ आजही राखून ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर बडा उदासी नंतर नवा उदासी हे स्नाने करतात. शेवटी निर्मळ आखाडा शाही स्नानाकरिता येतो. दुपारी बारा वाजेनंतर सर्व भाविकांना स्नानाची परवानगी दिली जाते. सिंहस्थ काळात कुशावर्त तिर्थावर स्नानाबरोबर श्राध्दाचे देखील विशेष महत्व आहे. प्रभु श्री. रामचंद्र वनवासात आले असता सिंहस्थ कालावधीत कश्यप ऋषींनी त्र्यंबकेश्वरी जाऊन राजा दशरथाचे श्राध्द करण्यास सांगितले असा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. गंगेच्या उगमापासून नांदेड आब्जकतीर्थ तसेच शेवट राजमहेंद्री पर्यंत संपूर्ण गोदापात्रात स्नानाचे महत्व आहे. त्या त्या विभागातले लोक जवळच्या क्षेत्री जाऊन गोदास्नानाचे पुण्य पदरात पाडून घेत असतात.