मराठी हिन्दी English

फोन नं. +९१-२५९४-२३३२१५
+९१-२५९४-२३४२५१

श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान

श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर शुक्रवार दिनांक १६ फेब्रुवारी १७८६ महाशिवरात्रीच्या सुप्रभाती सनई चौघडयांच्या मंजुळ सुरांनी भेरी तुतारी रणशिगांचा स्वर फुगडी घालत होता. ज्योर्तिलिंग महामृत्युंजय श्री. त्र्यंबकराज मंदिराचा जीर्णोध्दार. सतत ३१ वर्ष चाललेला. श्री. त्र्यंबकराज मंदिराचा संकल्प श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी केला. वास्तुशिल्पकार यशवंतराव भगवंत यांच्या देखरेखीखाली दि. २६ डिसेंबर रोजी हे काम सुरू झाले. त्यांचा पुत्र गणेश नारायण याने ते काम पार पाडले. ७८६ कारागीर सतत ३१ वर्षे या निर्मितीसाठी झटत होते. राजस्थानातील मकरांना येथुन संगमरवरी दगड आणण्यासाठी ४८ उंट ८५ हत्ती व १२२ घोडे भोलेनाथाच्या सेवेत रूजु झाले होते. मंदिर निर्मितीस एकुण ९ लक्ष रुपये खर्च आला. मंदिर जीर्णोध्दार शुभारंभ व समारोपाचा कलावधी यांची नोंद उत्तर दरवाजावरील प्रवेशद्वारावर संस्कृत भाषेत कोरलेले आहे.

पुर्व - पश्चिम २६५ फुट व दक्षिणोत्तर २१८ फुट लांबी रुंदी असलेले हे शिवालय आहे. पुर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चारही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. अध्यात्मात पुर्व दिशा म्हणजे सुरूवात व पश्चिम दिशा म्हणजे परीपक्वत्ता, दक्षिण दिशा म्हणजे पूर्णत्व, उत्तर दिशा म्हणजे साक्षात्कार होय. मंदिर वटबंदिचे उत्तरेकडील द्वार हे सर्वात मोठे आहे या महाद्वारातूनच भाविक प्रवेश करतात. उत्तरेकडील या महाद्वारावर ३८ बाय १५ फुटाचा नगारखाना आहे. पश्चिम व दक्षिण प्रवेशद्वाराच्या आतील फरसबंदि काटकोनाच्या परीघात श्री पुजनासाठी आवश्यक असलेल्या पाण्यासाठी एक रेखीव तलाव असून त्यास अमृत कुंड असे म्हणतात. अमृतकुंडाची खोली मंदिराच्या उंचीएवढी आहे. खाली विस्तृत पटांगणाच्या मध्यभागी पूर्वाभिमुख मुख्य देवालय आहे. या मुख्य प्रासादाची लांबी १६० फुट पुर्वपश्चिम असुन दक्षिणोत्तर रुंदी १३१ फुट आहे. फरसबंदिपासून मंदिराची उंची ९६ फुट आहे. मंदिराच्या घुमटाच्या गोलाकाराचा व्यास १८५ फुटाचा आहे. प्रासादावर तीन सुवर्णकलश व वृषभाचिन्हांकित सुवर्णध्वज पेशव्यांचे सरदार अण्णासाहेब विंचुरकर यांनी ५ ऑक्टोंबर १९७२ रोजी बसविले होते.

मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर नंदीचे मंदिर आहे. मुख देवालयास पुर्वाभिमुख व दक्षिणोत्तराभिमुख असे तीन दरवाजे आहे. पुर्वदिशेच्या मुख्य प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर एक आकर्षक सभामंडप असुन त्यावर उंच मेघडंबरी आकाराचे वितान आहे. त्याचे मध्यभागी घोटीव संगमरवरी कासव आहे. परमेश्वराचे दर्शन घेताना कासवाप्रमाणे आपले काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोहादी षडरिपुंचे पाय आकसुन आत घेतले म्हणजे प्रभुकृपेची कणखर पाठ प्राप्त होते. असेच जणु हे कासव आपल्याला सांगत असते.

पश्चिमेस मुख देवळाचा गाभारा आहे. सभामंडपातील कोनाडयात भैरवादिकांच्या सुंदर मुर्ती आहेत. पश्चिमेकडील ५ पायर्‍या उतरून गर्भगृहात प्रवेश केल्यावर संगमरवरी दगडाचे फरसबंधित परिवर्तित केलेल्या अग्रभागी वालुकामय दगडाची स्वयंभु शालुंका असुन त्यात अंगुष्ठाकार ब्रम्हा, विष्णू, महेशाची ३ बाणलिंगे आहेत. महेशाच्या बाणावरून अव्याहतपणे वाहणारा गंगाप्रवाह वैशिष्टयपुर्ण आहे. या स्वंयभू ज्योर्तिलिंगाचे पुर्वेस पार्वतीची संगमरवरी मुर्ती आहे.


ब्रम्हगिरी

दृष्टी पडता ब्रम्हगिरी तया नाही यमपुरी.....अशाप्रकारे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी ब्रम्हगिरीचे महात्म्य सांगितले आहे. या ब्रम्हगिरीचे दर्शन घेतले असता मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो असे पुराणात वर्णन केलेले आहे. ब्रम्हगिरी हा किल्ला समुद्र सपाटीपासून ४२४८ फूट उंच आहे व त्याचा घेर १० मैल आहे. वरच्या माथ्याचा ४ मैल सभोवती सर्व बाजुंनी ३०० ते ४०० फुट उंचीचा कडा असुन किल्यावर जाण्यासाठी दोन दरवाज्याशिवाय तिसरा दरवाजा नाही. मुख्य दरवाजा दक्षिण दिशेस असुन त्यातुन सैनिकास धान्य पुरवठा होत असे. माथ्यावर किल्ल्याचे अवशेष असुन तेथुन आत गेल्यावर किल्ल्याची वेस लागते. उत्तरेकडील बाजु, दक्षिण बाजु इतकी उंच नसली तरी याबाजुचा कडा फारच उभा आहे. तेथे तळघरे व राहण्याच्या जागा खडकात खोदलेल्या आहेत. इ.स. १६३६ मध्ये शहाजीने हा किल्ला खान जमाने यांच्या हाती केला. इ.स. १७२० पर्यंत हा मोगलांच्या ताब्यात होता. इ.स. १७५२ साली निजामांपासून तो मराठयांनी घेतला. इ.स. १८१८ मध्ये तो ब्रिटीशांनी घेतला, व सध्या भारत सरकारच्या ताब्यात आहे.

सध्यास्थिती - या किल्ल्यावर चढण्यासाठी उत्तरेच्या बाजुने करांची येथील श्रमण दानशूर लालचंदशेठ यांनी ४०० पायर्‍या बांधल्या आहेत. या चढुन गेल्यावर दगडात कोरलेले तीन जिने आहेत. जिने चढुन गेल्यानंतर किल्ल्यावरील उंच सखल मैदान लागते. रस्त्यात कोटी नावाचे तिर्थ आहे. मागील बाजूस उत्तरेकडे श्री. शंकराचे मंदिर आहे. याठिकाणी गोदावरीचे उगमस्थान आहे. त्याठिकाणी वावडीच्या आकाराचे कुंड आहे. किल्ल्याच्या उत्तरबाजूस श्री शंकरांनी जटा आपटल्याचे ठिकाण आहे. तो एक खडकाचा भाग असून त्यास दोन खळगे आहेत. त्या गुडघ्यांच्या खुणा आहेत. व खडकास काही रेषाकार भाग आहे. त्या जटा आहे असे म्हणतात.


गंगाद्वार

गंगाद्वार हे ठिकाण ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी आहे. ७५० पायर्‍या चढुन जावे लागते. ब्रम्हगिरी पर्वतावरून गंगेचा ओघ प्रथम येथे दृष्टीस पडतो. म्हणुन यांस गंगाद्वार असे म्हणतात. येथे गंगेची मुर्ती असुन गोमुखातून गंगेचा पावठा आहे. गंगेच्या मुर्तीजवळ गुहेच्या आकाराचे कुंड आहे. त्यास वराह तीर्थ असे म्हणतात. त्याच्या उत्तरबाजूस कोलंबिका देवीचे मंदिर आहे. या पर्वताच्या पठरास उत्तरभागी अष्टयोत्तर (अठह्याहत्तर) शिवलिंगे व गोरक्षनाथ गुंफा, मच्छिंद्र गुहा असे स्थान आहे. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांना गोरक्षनाथ गुंफेतच गहिनी नाथांकडुन आत्माज्ञान झाले. रस्त्यात रामकुंड व लक्ष्मण कुंड असे दोन तीर्थ आहे. गंगाद्वारास जाण्याकरता मुंबई येथील श्रीमान पुण्यात्मा हंसराज करमसी यांनी ७५० पायर्‍या बांधल्या आहेत.कुशावर्त तीर्थ

श्री त्र्यंबकेश्वर येथे संपूर्ण भारतातून श्रध्दायुक्त अंत:करणाने श्री त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी, कुशावर्त तीर्थ स्नानासाठी, ब्रम्हगिरीची परिक्रमा करण्यासाठी, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी अनेक श्राध्द विधी व सर्व रोग दु:ख, पाप नष्ट होण्यासाठी सतत भाविकांचा ओघ अतिशय ओघ चालु असतो. सहस्त्र जन्मात केलेला पुण्यसंचय एकीभुत जेव्हा होतो. तेव्हास मानवास त्र्यंबक क्षेत्रास जाण्याची बुध्दी होते. शास्त्रकारांनी मुल स्थान म्हणजे कुशावर्त तीर्थ यास अतिशय महत्व दिलेले आहे. याचे कारण असे की गौतम ऋषींनी गंगेचा ओघ त्यांचे धान्य तयार करण्यासाठी जी जागा, खळे त्याच्या जवळ दृष्टीस पडली तेथे त्यांनी अभिमंत्रित दर्भानी गंगेच्या पाण्याचा ओघ अडवला व तेथेच त्यांनी गंगेत समंत्रक स्नान केले म्हणून त्या तीर्थास कुशावर्त तीर्थ असे म्हणतात. येथे स्नान केल्यानंतर गौतमाचे गोहत्येचे पाप नाहीसे झाले. या ठिकाणापासून गंगेस गोदा म्हणू लागले. तयाप्रमाणे पिता पुत्र तत्वत: एकच असले तरी जन्मदाता पिताच श्रेष्ठ मानला जातो. त्याचप्रमाणे उगमापासून समुद्रापर्यत गोदावरी सर्व ठिकाणी पवित्र असली तरी उगमस्थानाला विशेष महत्व आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी असे म्हटले आहे. त्या मार्गाचा कापड महेश अजुनी, साक्षात शीव हे सुध्दा ज्ञान मार्गाचे वाटसर आहेत. मग श्री. गजानन महाराज, श्री. स्वामी समर्थ ह्यांचे श्री त्र्यंबकराजाच्या जवळ आगमन होणे स्वाभाविकच आहे. त्याप्रमाणे त्र्यंबकेश्वरच्या प्रवेश द्वाराजवळच श्री. गजानन महाराजांचे अतिशय सुंदर मंदिर व धर्मशाळा आहे. त्याचबरोबर त्यांच्या जवळच श्री. स्वामी समर्थ यांचेही सुंदर मंदिर असुन दोन्ही ठिकाणी भाविकांसाठी राहण्याची उत्तम सोय आहे. तसेच निलपर्वत नावाची टेकडीही त्र्यंबकेश्वरी पर्यटनीय आहे.